पुणे : पर्चेस ऑर्डर घेवून स्टील मटेरीयलचा पुरवठा न करता ३४ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ ते १७ मे २०२४ कालावधीत घोरपडी येथील एबीआयएल बुलवार्ड कंपनीत घडला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत श्रीधर मोहन दुमाळे (वय-५० रा. रायकर पार्क, सिंहगड रोड पुणे) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन छगनलाल गुलाबचंद गुंदेशा (वय-६०), निरज छगनलाल गुंदेशा (वय-३१ दोघे रा. भवानी पेठ, पुणे) यांच्यावर भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे विविध कंपनीचे स्टीलचे अधिकृत विक्रेते आहेत. त्यांनी फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीकडून स्टीलची ऑर्डर घेऊन फिर्यादी यांच्या कंपनीच्या साईटवर मालाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीकडून ६२ लाख ६७ हजार ८६४ रुपये घेतले. त्यापैकी २८ लाख ३२ हजार ८४९ रुपयांचे स्टिल फिर्यादी यांच्या कंपनीच्या साईटवर पोहोच केले.
मात्र, उर्वरीत ३४ लाख ३५ हजार ०१५ रुपयांचे स्टील न देता उर्वरित रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने चेकवर खोट्या सह्या करुन फिर्यादी यांना दिले. चेक वटले नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी खोटे चेक देऊन फिर्य़ादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.