पुण्यात दिवसेन दिवशी गुन्ह्याच्या घटना वाढत आहे. पुण्यात एका नराधमाने पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. त्यानतंर झाडाला गळफास घेत जीवन संपवलं.पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक बे परिसरात ही घटना घडलीय.
सुवर्णा सोमनाथ वाघ असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर सोमनाथ सखाराम वाघ असं पतीचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले. उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली. ते दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. तिथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला.
पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. दरम्यान, सकाळी ११ वाजून गेले तरी ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध घेतला. सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात दिसली. परिसरात शोध घेतला असता आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.