पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने दोन आयटी अभियंत्यांना आपल्या आलिशान पोर्शे गाडीखाली चिरडले. ही घटना कल्याणी नगरमध्ये रविवारी (दि. १९) पहाटे तीनच्या सुमारास झाली. अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन मुलांना दारू देणाऱ्या बार मालकांवर बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ नुसार गुन्हा दाखल केला असून विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ महादेव तोडकरी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्य़ादीत म्हटले आहे की, मुलगा अल्पवयीन आहे, त्याचेकार चालविण्याचे प्रशिक्षण झाले नाही, तसेच त्याला कार चालविल्यास त्याच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो असे माहित असतानाही पोर्श कार त्याला चालवण्यासाठी दिली. त्याचबरोबर मुलगा मद्य प्राशन करतो हे माहित असतानाही त्याला पार्टी करण्याची परवानगी दिली. या कृत्यासाठीही बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५, ७७ प्रमाणेही विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिल्डरचा ‘बळाचा’ वापर
बिल्डर विशाल अग्रवाल याने आपल्या पोरासाठी मध्यरात्रीच ‘बळाचा’ वापर करत आपला मुलगा कार चालवत नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ड्रायव्हरला त्याठिकाणी उभा केला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शीनी केलेल्या धुलाईने आणि दिलेल्या माहितीने भांडाफोड झाला होता. यानंतर पोलिसांनी सुद्धा अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले.
अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय मुलावर भा.द.वि. कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अकिब रमजान मुल्ला (वय २४, रा. चंदननगर, मुळ रा. लोकमान्य नगर, आसरा चौक, सोलापूर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीला जामीन मंजूर
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात दोन जणांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत त्याने एका दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत येरवडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याला सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते. एफआयआर मधील सर्व कलम बेलेबल असल्यामुळे काही अटींवर जामीन मंजूर झाला आहे. काही अटींवर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.
मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता- पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, कल्याणीनगर भागात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी दारु पिऊन कार चालवित होता. ही बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणी आम्ही पब मालक, आरोपीचे वडील आणि विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या शो रुमच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी हा कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यायालयाने काही अटीच्या आधारे जामीन दिला आहे. पण हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का? याबाबतचा तपास आमची टीम शाळेत जाऊन करत आहे. तसेच आम्ही दिल्ली येथील निर्भया प्रकरणी आरोपींना जामीन दिला नव्हता त्यानुसार या आरोपीला जामीन देता कामा नये अशी मागणी देखील केली होती. मात्र, आमची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
बार मालकांवर गुन्हा दाखल
अपघात घडण्यापूर्वी आरोपी अल्पवयीन मुलाने मेरियट सुट्समधील ब्लॅक आणि कोझी रेस्टॉरंटमध्ये अशा दोन ठिकाणी पार्टी केली होती. मेरीयट सुट्स या पंचतारांकित हॉटेलच्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विकणे महागात पडले असून याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक सागर चोरडिया यांच्या विरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. याशिवाय कोझी या बारचे मालक प्रल्हाद भुतडा यांच्याविरुद्ध देखील आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे अशी माहिती, माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.