पुणे: नियमांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्यंत हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मधील कामगारावर कारवाई केली. याचा राग आल्याने हॉटेल मालकांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या मेन गेट समोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (दि.१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस शिपाई अमोल आबासाहेब गायकवाड (वय-३५ रा. कोरेगाव भिमा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सत्यवान हौशीराम गावडे (वय-३४), राम अशोकराव गजमल (वय-२२ दोघे रा. उबाळेनगर, वाघोली) यांच्यावर भा.दंड,वि,कलम ५०६, ३०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे उबाळेनगर वाघोली येथे न्यु प्यासा हॉटेल आहे. आरोपींनी नियमांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्य़ंत हॉटेल सुरु ठेवले. त्यामुळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे यांनी कारवाई करुन हॉटेलमधील कामगार राम गजमल याच्यावर गुन्हा दाखल केला. याचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता आरोपी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या मेन गेट समोर आले. त्यांनी सोबत आणलेला ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे, पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत.