पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांची परेड घेतली होती. त्यानंतर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारांची हजेरी घेतली होती. अशातच येरवडा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराकडून २ पिस्टल आणि ४ काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई वडगाव शेरी भागातील नदीपात्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.
अभिषेक नारायण खोंड (वय-२३ रा. लोहगाव रोड, वाघोली, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून मोक्का गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. सहा महिन्यापूर्वी तो येरवडा कारागृहाबाहेर आला होता.
येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार कैलास डुकरे व सुशांत भोसले हे 17 एप्रिल रोजी गुन्हेगार तपासत असताना त्यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार अभिषेक खोंड याच्याकडे पिस्टल असून तो वडगाव शेरी भागातील नदीपात्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेत कोणाची तरी वाट बघत थांबला आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल व दोन काडतुसे जप्त केली. त्याच्यावर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली. त्याची पोलीस कस्टडी घेऊन सखोल तपास केला असता त्याच्याकडून आणखी एक पिस्टल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली.आरोपीकडून ६५ हजार ५०० रुपये किमतीचे एकूण २ पिस्टल व ४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांच्या पथकाने केली.