पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एका शाळेच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या महिला शिक्षिकेविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित शिक्षिकेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार पुण्यातील बाजीराव रोडवरील अप्पा बळवंत चौकातील एन.म.वी शाळेत घडला आहे. पीडित मुलगा इयता ९ वी मध्ये शिकत असून त्याने गोंधळ घातल्याच्या कारणावरुन संतापलेल्या महिला शिक्षिकेने त्याला वर्गात सर्वांसमोर लाथाबुक्यांनी मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ वगातील एका विद्यार्थ्याने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, खाकी पँट व पांढरा शर्टमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसलेला पाहयला मिळत आहे. या विद्यार्थ्याला जाब विचारत शिक्षिका त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आहे. ‘आहो टीचर सोडाना आता’ अशी विनवणी विद्यार्थी शिक्षिकेकडे करत आहे. मात्र, याचा परिणाम संबंधित शिक्षिकेवर झाला नाही. तिने विद्यार्थ्याचा हात पिरगळून त्याच्या तोंडावर फटके मारताना दिसत आहे. वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ चित्रित केला. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे.
व्हायरल झालेले व्हिडीओ मुलाच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला.
त्यांनी थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध तक्रार दिली. विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या पूजा केदारी या शिक्षिकेला संस्थेने बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. यापूर्वी देखील या शिक्षिकेने अनेक मुलांना अशाच प्रकारे बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.