पुणे प्रतिनिधी
पुणे : जालन्यातील अंतरवली सराटी गावात भव्य आणि ऐतिहासिक अशी सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी पुण्याच्या दिशेने कूच केली आहे. सकाळी ७ वाजता जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन ते पुणे दौऱ्याला सुरूवात करतील.
सकाळी ११ वाजता जरांगे पाटील यांची खेडच्या राजगुरुनगर येथे जाहीर सभा होईल. या सभेसाठी तब्बल १०० एक्कर जागा निश्चित करण्यात आली आहे. खेडच्या सभेनंतर जरांगे पाटील हे बारामतीत दाखल होणार आहेत. तिथे देखील ते सभा घेणार आहेत.
या दोन्ही सभांसाठी लाखो मराठा बांधवांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. १४ ऑक्टोबर रोजी जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी गावात विराट सभा घेतली होती. या सभेत त्यांनी येत्या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा मोठं आंदोलन करु, असा इशारा दिला होता.
इतकंच नाही, तर एकतर मराठ्यांना आरक्षण मिळेल. त्याचा जल्लोष होईल, किंवा माझी अंतयात्रा निघेल, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आजच्या सभेत काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काय?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, तसंच त्यांचा ओबीसीत समावेश करा.
कोपर्डीतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तातडीने फासावर चढवा.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी द्या.
सारथी मार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी द्या. त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी, व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार.
मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्या, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली आहे.












