पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून दिवसा आणि रात्रीच्यावेळी घरफोडीचे गुन्हे वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास एकाच सोसायटीमधील पाच घरांमध्ये घरफोडी झाली. चोरट्यांनी एकाच सोसायटीतील पाच घरे भरदिवसा फोडल्याने कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी दोन घरांमधून पावणे चार लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.६) दुपारी पावणे तीन ते चार या दरम्यान कात्रज परिसरातील सोपानकाका नगर येथील मंगलम सोसायटीत घडला आहे. याबाबत मारुती विष्णू थिटे (वय-५९ रा. फ्लॅट नं. ५०६ फेज नं. १, मंगलम सोसायटी, सोपानकाका नगर, गुजरवाडी रोड, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. कलम ४५४, ३८०, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास कपडे वाळत टाकण्यासाठी घराला कुलूप लावून टेरेसवर गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख ४६ हजार २५० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याच कालावधीत चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या बिल्डींग मधील महेंद्रसिंग परमार, हर्षल ढमाले यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. तर दिलीप फणसे व मांगीलाल चौधरी यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने फणसे यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरट्याने अवघ्या एका तासात सोसायटीमधील बंद घराचे कुलूप तोडून ३ लाख ८३ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता करीत आहेत.