पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना घडली.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. प्रविण मळेकर (वय 30, रा. गुरुवार पेठ, आधार काँम्प्लेक्स फ्लँट नंबर 301, युको बँकेचे समोर कस्तुरी चौक, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना शनिवारी (दि. २)रात्री ७.४५ वाजण्याच्या आसपास संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर वासुंदे हद्दीतील इंडियन ऑईल पंपासमोर घडली घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रवीण मळेकर हे शनिवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास हिरो होन्डा पँशन मोटारसायकल (नंबर MH १३ EP ९३३६ ) यावरुन बँक आँफ महाराष्ट्र शाखा बारामती या बँकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी राहत्या घरातून बारामती परिसरात गेले होते. ते नोटीस बजावून घरी जात असताना रात्री पावणे आठ वाजण्याच्या आसपास कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने हल्ला करून कोणत्या तरी अज्ञात कारणाने त्यांच्यावर वार करून त्यांचा खून केला.
दरम्यान, प्रवीण मळेकर यांना उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी मृत प्रवीण मळेकर यांचा मुलगा ऋषिकेश यांना दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तींच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे करीत आहेत. दरम्यान , या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून त्यासाठी एक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि १५ पोलीस कर्मचारी असे पथक तपासासाठी तैनात करण्यात आले आहे. लवकरच या गुन्हयाचा छडा लावून आरोपी जेरबंद करण्यात येईल. अशी माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली.