पुणे प्रतिनिधी
मुंबई : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिरावरून वाद सुरू आहे. पुण्यातील कसबा परिसरात हे मंदिर असून याप्रकरणी हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यातच आज त्यांनी सोलापुरात वादग्रस्त विधान केलं आहे.
मिलिंद एकबोटे म्हणाले की, हिंदू समाजाचे संघटन वाढलं पाहिजे, यासाठी सोलापुरात महाआरतीचे आयोजन केलं आहे. पुण्येश्वर मंदिरप्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत ते म्हणाले की, आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते आकसापोटी दाखल झाले आहेत. त्या चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचही ते म्हणाले.
ते पुढं म्हणाले, पुण्येश्वराच्या मंदिराजवळ अतिक्रमण केलं आहे. तिथं एक दर्गा स्थापन केला.
औरंगजेबाच्या भाच्याची कबर बांधली. आता मस्जीद बांधत आहे. विनापरवाना धार्मिक बांधकाम तोडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचंही एकबोटे यांनी म्हटलं. दरम्यान आम्ही अतिक्रमण काढायला लावणारच, अतिक्रमण काढलं नाही, तर आम्ही तिथं बाबरी कांड घडवू असं वादग्रस्त विधान एकबोटे यांनी केलं.












