दुकानावर इन्कम टॅक्स विभागाची रेड पडणार असल्याचे सांगून सहायक पोलीस आयुक्त यांच्या मुलाच्या दुकानातील व्यवस्थापकाने ५ किलो सोने व ५० किलो चांदी आणि रोकड असा एकूण २ कोटी २७ लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. ही घटना १२ मार्च २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी व्यवस्थापक विनोद रमेश कुलकर्णी (वय-३५ रा. लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ज्योतीरादित्य उर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय-२२ रा. निलगीरी लेन, बाणेर रोड, औंध) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दोन वर्षांपूर्वी माळवाडी रोड हडपसर येथील शिवनेरी बिल्डिंग मध्ये वसुंधरा ज्वेलर्स नावाचे सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरु केले होते. या दुकानात व्यवस्थापक म्हणून विनोद कुलकर्णी याची नेमणूक केली होती.वसुंधरा ज्वेलर्स दुकानामध्ये ५ किलो सोने, ८५ किलो चांदी अशी भांडवली गुंतवणूक फिर्यादी यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून घेऊन केली होती. दरम्यान, फिर्यादी एमएस चे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे निघून गेले होते. त्यावेळी संपूर्ण दुकानाची जबाबदारी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याच्याकडे होती. फिर्याद ज्योतिरादित्य मोकाशी हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी दुकानाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली.
दुकानाबाबत व्यवस्थापक कुलकर्णी व इतर कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत असताना मोकाशी यांच्या लक्षात आले की, दुकान सुरु करताना ५ किलो सोने व ८५ किलो चांदी घेतली होती. त्यापैकी पावणे तीन किलो सोने व ५० किलो चांदी कमी आहे. यानंतर मोकाशी यांनी ही बाब वडिल राजेंद्र मोकाशी यांना सांगितली. वडिलांनी सोने, चांदी कमी असल्याबाबत कुलकर्णी याच्याकडे चौकशी केली असता त्याने ७ फेब्रुवारी रोजी सर्व सोने परत देतो व हिशोब पूर्ण करतो असे सांगून निघून गेला.
यानंतर ८ फेब्रुवारी रोजी विनोद कुलकर्णी याने सकाळी दहाच्या सुमारास दुकानातील एका कामगाराला फोन करुन सांगितले की, दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे व मालकाला हिशोब द्यायचा आहे. त्यासाठी सोने, चांदी तयार ठेव. यानंतर काही वेळाने एक गाडी आली. कामगाराने दुकानातील सर्व सोने, चांदी दिली. आणि विनोद याने सांगितल्या प्रमाणे दुकान बंद केले. व्यवस्थापक कुलकर्णी याच्याकडे सोपवण्यात आलेले पाच किलो सोने, ८५ किलो चांदी आणि रोख रक्कम अशी दोन कोटी २७ लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.