पुण्याकडून शेगावला जाणाऱ्या बस चा अपघात झाला. हा अपघात पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीत चिखली ते देऊळगाव राजा जाणाऱ्या रोडवर रामनगर फाटा येथे झाला आहे. हा अपघात आज सकाळी 05.30 वाजता सुमारास झाला.
पुणे ते शेगाव जाणारी एसटी बस क्रमांक MH14-LB-0544 व ट्रक क्रमांक HR 55-M0288 मध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये बसमधील एकूण 19 प्रवासी जखमी तर एकाचा मृत्यू झाला आहे.
सदर अपघातामधील जखमी यांना उपचाराकरिता चिखली येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सदर अपघात प्रकरणी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अंढेरा पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आले आहे.