पुणे दि. ४ : ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या व खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोल रजेवर असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – १ कडून करण्यात आली आहे. रोहित शंकर पासलकर (वय २० रा. मु.पो. रुळे मोरदरी ता. वेल्हे,जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला फरार आरोपी राहत्या घरी येणार असल्याची माहिती सिंहगड रोड व उत्तमनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असलेले पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सदरचा गुन्हा कबूल केला असून पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहायुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे -१ सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील, गणेश ढगे यांनी केले आहे.












