पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : पोलिस स्मृती दिनाचे औचित्य साधत पाषाण येथील पोलिस संशोधन केंद्र येथे पोलिस स्मृतीदिन संचलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी संपूर्ण वर्षात आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती पत्करलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते. हा दिवस पोलीस दलासाठी अभिमानाचा, शौर्याचा, मानवंदना देण्याचा तसेच आपल्या जुन्या सहका-यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा असतो.
२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जाण्यास कारण म्हणजे १९५९ मध्ये लडाख भागातील सरहदीवर झालेली घटना. त्यानंतर पाटणा येथे १९५९ साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धाच्या वेळी सर्वांनी ‘आमच्या हया वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी २१ ऑक्टोंबरला पोलीस हुतात्मा दिन पाळुन करू अशी शपथ घेतली आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिन भारत वर्षात मोठया सन्मानाने पोलीस हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात येतो. राज्या-राज्यातुन पोलीस दले या हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजित करून त्यांना मानवंदना देतात.
दि. १ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकुण १८८ जवान यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा.पो.निरी. सुदर्शन भिकाजी दातिर,पो. हवा. गौरव नथुजी खरवडे,पो. हवा. जयंत विष्णुजी शेरेकर,पो. हवा. विठ्ठल एकनाथ वदने,पो.ना. संजय रंगराव नेटके,पो. ना. अजय बाजीराव चौधरी अशा एकुण ०६ पोलीस जवानांचा समावेश आहे.

मा. वाइस एडमिरल (अजय कोच्छर), ए.व्हि. एस. एम. एन. एम. कमांडट, नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, खडकवासला, पुणे ह्यांच्याकडून हुतात्म्यांना पोलीस संशोधन केंद्र पाषाण रोड, पुणे येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी हे हजर होते.
मा. वाइस एडमिरल (अजय कोच्छर) यांच्या संदेश वाचनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वर्षी शहीद झालेल्या अधिकाऱ्यांच्या नामावलीचे वाचन करून त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
शहीद झालेल्या अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी तीन फैरी झाडून तसेच बिगलर ड्रमर यांच्याकडून राऊस रिवाली वाजवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.












