पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करुन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केला आहे. त्यानंतर पोलिसांनी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना आणि वितरणाचे जाळे उधवस्त केले. यानंतर पुणे पोलिसांनी ड्रग्ज पेडलरकडे आपले लक्ष्य केंद्रित केला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच एका ५२ वर्षीय माफियाला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मृत माफिया पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याच्यावर यापूर्वी ड्रग्ज विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन केले जात होते. त्यावेळी माफिया त्याच्या नाना पेठेतील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक माफियाच्या घरी गेले. पोलिसांनी दरवाजा वाजवला. माफियाने दरवाजा उघडला असता त्याला समोर पोलीस दिसले. पोलिसांना पाहताच तो खाली कोसळला. पोलिसांनी आणि त्याच्या घरच्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे घोषित केले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये त्याच्या घरात काही ग्रॅम ड्रग्ज सापडले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.