मावळ : मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील मोठ्या फरकाने निवडून येतील. शिवसेनेतून बंडखोरी केलेले उमेदवार पुढे आहेत. बंडखोरांचा पराभव हेच आपले पहिले धोरण आहे. यामुळे पुन्हा गद्दारी कोणी करणार नाही, असा टोला राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.
संजोग वाघेरे पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. सध्या राज्यात महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण असून आम्ही राज्यात घवघवीत यश प्राप्त करू. आम्हाला विश्वास आहे की, पुणे जिल्ह्यातील चारही जागा आम्ही जिंकू. पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर आणि संजोग वाघेरे पाटील प्रचारात पुढे असल्याचे राऊत म्हणाले.
विरोधकांकडून बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात पोलीस बळाचा वापर केला जात आहे. सध्या मोदींना काही काम राहिलेले नाही. त्यांचा जीव महाराष्ट्रातील ४८ जागांमध्ये अडकला आहे. पण महाविकास आघाडी राज्यातील ३५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
राज्यातील प्रत्येक जागेसाठी घटक पक्षातील कार्यकर्ता काम करत आहे. भाजपने केवळ एका जागेसाठी अशोक चव्हाण यांना पक्षात घेतले. ती जागा देखील भाजप जिंकणार नाही. बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजय होईल, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोग ही भाजपची एक शाखा असल्याचे म्हटले. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी ती संस्था भाजपच चालवत आहे. मोदी फौजफाटा, विमान घेऊन एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी फिरत असून ते आदर्श आचारसंहितेचा भंग करत असल्याचेही त्यांनी म्हटले.