खोट्या कागदपत्रांच्या आधारे चारचाकी गाडी आपली असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३६ लाख रुपये किमतीची ६ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करुन १५ ते १७ जणांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आयुष अभय कुलथे (वय-२५ रा. गोल्ड फिंगर तमारा सोसायटी, रहाटणी, पिंपरी), सुजित भाईदास बडगुजर (वय-२६ रा. त्रिमया सोसायटी, झील चौकाजवळ, नऱ्हे, पुणे), प्रथमेश संतोष शेटे (वय-२२ रा. स्वप्न नगरी हौसींग सोसायटी, गुरुद्वारा चौकाजवळ, आकुर्डी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत गणेश बबन जगदाळे (वय-२८ रा. खासगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी २५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
स्वारगेट बस स्थानकाजवळ आयुष कुलथे याने त्याचे नाव नवनाथ खजिने असे खोटे सांगून व त्याच नावाचे व गाडीचे खोटे व बनावट आधार कार्ड, आर.सी.कार्ड इत्यादी कागदपत्रे फिर्यादी यांना देऊन कार दिली. ही कार त्याने भाडे तत्वावर घेऊन गाडी त्याचीच असल्याचे भासवून फिर्यादी गणेश जगदाळे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आयुष कुलथे, अतिष नागतिलक, प्रथमेश शेटे, श्रीकांत बल्लोरे, सुजित बडगुजर, प्रविण सोनवळे व आकाश सोनवळे व त्यांच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन व बनावट कागदपत्राच्या आधारे कारची विक्री करुन फसवणूक केली.
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिस शेख, शिवा गायकवाड, संदीप घुले यांनी शोध घेऊन तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरुन शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. तपासादरम्यान त्यांनी व पाहिजे असलेल्या आरोपींनी १५ ते १७ चारचाकी वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून बनावट कागदपत्रे व ३६ लाख रुपये किमतीची ६ चारचाकी वाहने जप्त केली आहेत.
ही कारवाई अपर पोलस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्या आदेशाने; तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार अनिस शेख, शिवा गायकवाड, संदीप घुले, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दिपक खेंदाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, अनिता धायतडक यांच्या पथकाने केली.