पी.एम.पी.एम.एल. बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरने कापून चोरून पळून जाताना दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे मनपा येथील छत्रपती शिवाजी ब्रिजवर करण्यात आली.
याबाबत मंदाकिनी काळराम फुगे (वय-७० रा. गुरुमय्या शाळेसमोर, चिंचवड गाव, पिंपरी चिंचवड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमित नाना चव्हाण (वय-२७ रा. ससाणे नगर लेन नं. २, निकम हाईट्स, हडपसर), नेहा बबन सोनवणे (वय-२० रा. ओटा स्किम निगडी) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९२. ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला चिंचवडगाव येथे जाणाऱ्या पी.एम.पी.एम.एल. बसमधून प्रवास करत होते. छत्रपती शिवाजी ब्रिजवर बस आली. गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी फिर्य़ादी यांच्या हातातील १ लाख ३ हजार रुपये २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी कटरने तोडून हिसकावून पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता प्रवाशांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बडे करीत आहेत.