पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
निगडी दि.१६ : – पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन तर्फे स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मंगळवार (१५ ऑगस्ट) करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘आकार’ व ‘अभिवादन भारतीय स्वातंत्र्याला’ या समूह गायनाने झाली. ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समूह गायनाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध वयोगटातील सुमारे सोळा शालेय विद्यार्थ्यांनी ही देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन व गीतांना वाद्याची साथ मुलांनीच केली. ‘हम करे राष्ट्र आराधन’, ‘तुम समय की रेत पर चलो निशान’, ‘भारत हमको जान से प्यारा हैं’, ‘कंधो से मिलते हैं कंधे, कदमोंसे कदम मिलते है’, ‘सुनो गौरसे दुनिया वालो’, ‘मां तुझे सलाम’ या सारखी देशप्रेम जागवणारी गीते निवेदनासह सर्व बालगायकांनी सादर केली.
चित्रा देशपांडे व त्यांच्या सहकारी प्राची पंडित आणि मु्ग्धा बारहाते यांच्यासह सुरु करण्यात आलेल्या आकार संस्थेमार्फत लहान मुलांमध्ये दडलेल्या कलाकाराला आकार देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या कार्यक्रमांमध्ये गायन, वादन, निवेदन सारे मुलांचेच असते.

पुढील सत्रात मध्ये ‘शब्दरंग ज्येष्ठ नागरिक कला साहित्य कट्टा’ संस्थेच्या ज्येष्ठ कलाकारांनी स्वच्छता अभियान व प्लॅस्टिकमुक्त भारत या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. ज्योती कानेटकर व चंद्रशेखर जोशी व त्यांच्या कलाकारांसह देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा कसा उचलू शकतो याचे सुंदर दर्शन या पथनाट्यातून दिले. या पथनाट्याची संहिता ज्योती कानेटकर लिहिली.
त्यानंतर नृत्यशारदा कथक मंदिराच्या स्नेहल सोमण यांच्या विद्यार्थिनींनी ‘नृत्यांजली’ हे कथक नृत्य सादर केले. ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीने त्यांनी नृत्याला सुरुवात केली. ‘रास’ या अनवट तालावर थाट, आमद, तोडे, तुकडे, बेटी बचाव मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ‘ओ री चिरैया’, यासह ‘श्रीरामचंद्र कृपालू भज मन’ हे भजन सादर केले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘जयोस्तुते’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीपर गीतांसह ‘मृगनयनी’ या ब्रज भाषेतील गीतावर सुंदर नृत्य सादर केले. कृष्णलीला सांगणारे ‘जमुना के तट पर कृष्ण कन्हैया’ हे गीत सादर केले. पं. बिंदादीन महाराजांच्या ‘कलावती’ रागातील तराण्याने या कलाकारांनी त्यांच्या नृत्याची सांगता केली.
समाधान गुडदे, नवीन अक्कीवेल्ली, डॉ. सुमेधा गाडेकर, साक्षी मुजुमदार व संजीव तांबे यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. शास्त्रीय गायनाच्या १५ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक स्वरा किंबहुने हिला व दुसरा क्रमांक युक्ता बामणे हिला मिळाला. तसेच १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक हिमांशु तांबे याला व द्वितीय क्रमांक संजना साळुंके हिला मिळाला. तालवाद्य वादनात १५ वर्षांखाली गटात प्रथम क्रमांक निधीश गवस व दुसरा क्रमांक सोहम दीक्षित याला मिळाला. १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक वेद चिंचणकर व दुसरा क्रमांक ओंकार कुलकर्णी याला मिळाला. शास्त्रीय वादनात १५ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक स्वरुप कुलकर्णी याला व दुसरा क्रमांक हरी वाघमोडे याला मिळाला. १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक निमिषा हळबे हिला व दुसरा क्रमांक सानिका काटे हिला मिळाला. शास्त्रीय नृत्य स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक रिया गोखले, दुसरा क्रमांक शाल्मली येळकर हिला मिळाला. तसेच १५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक स्नेहल भालेराव हिला व दुसरा क्रमांक दर्शनी ठाकूर हिला मिळाला.
या सर्व पारितोषिक विजेत्यांना प्रवीण तुपे यांच्या सह पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनच्या पदाधिका-यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी यांनी केले.












