पुणे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ३४ गावांतील टँकर्सची संख्या वाढवा; महापालिका आयुक्तांचे अधिकार्यांना आदेश
कडक उन्हाळा आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पाण्याचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. प्रामुख्याने शहरात सध्या सुरू असलेल्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकामांसाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात प्रक्रीया केलेले पाणीच वापरावे असे आवाहन करतानाच समाविष्ट गावांतील पाण्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करा अशा सुचना महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीविषयी त्यांनी पत्रकारांना माहीती दिली. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केल्या गेलेल्या ३४ गावांतील पाणी पुरवठा व्यवस्थेची माहीती घेण्यात आली आहे. या गावांतुन मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या समाविष्ट गावांत काही ठिकाणी चार , तीन, दोन दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. गेल्यावर्षी या गावांत १ हजार ९८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता, यावर्षी हाच आकडा साडे बाराशेपर्यंत पोचला आहे, अशी माहीती भोसले यांनी दिली. समाविष्ट गावांतील पाणी पुरवठ्यासंदर्भात आराखडा तयार केला जात आहे, तो लवकर पुर्ण करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
*तर बांधकामे थांबविणार *
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा कमी होत आहे. उन्हाळ्याचे दोन महीने अद्याप बाकी आहे, या कालावधीत पाण्याची मागणी वाढते, तसेच बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते. यापार्श्वभुमीवर पुढील काळातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून पिण्याच्या पाण्याचा वापर हा बांधकामासाठी केला जात आहे.
बांधकामांकरीता एसटीपीमध्ये प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.परंतु याला बांधकाम व्यावसायिकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. केवळ ८० टँकर प्रक्रीया केलेले पाणी नेले जात आहे. पुढील काळात याबाबत प्रशासन गांभीर्याने कार्यवाही करणार आहे. वेळ पडली तर शहरातील बांधकामे थांबवावी लागतील. बांधकाम व्यावसायिकांनी एसटीपीमध्ये प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर करावा असे आवाहन केले आहे. या बांधकाम व्यावसायिकंावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या भागातील सुरु असलेली बांधकामे आणि त्या ठिकाणी कोणत्या पाण्याचा वापर केला जात आहे, याची पाहणी करून अहवाल सादर करावा असे आदेशही दिले आहे.