रावेत: बांधकाम साईटवर बाराव्या मजल्यावर कन्स्ट्रक्शन लिफ्टचे दुरुस्तीचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने कंत्राटदाराचा मृत्यू झाला. ही घटना पुनावळे येथील सोमानी टॉवर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साइटवर नऊ मार्च रोजी सकाळी सात वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी (दि. ६ एप्रिल) रोजी सुपरवायझर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तायप्पा भुसाप्पा (वय-३९ रा. पुनावळे ता. मुळशी मुळ रा. संगवार ता.जि. यादगीर कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी सुपरवायझर मनोज पवार (वय-३६ रा. पुनावळे) याच्यावर भा.दंड.वि. कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तायप्पा यांचे मेहुणे यलाप्पा आद्याप्पा यादगीर (वय-३२ रा. पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यलाप्पा यांचे दाजी असलेले कंत्राटदार तायप्पा हे सोमानी टॉवर या बिल्डिंगच्या बाराव्य मजल्यावर कन्स्ट्रकशनचा माल वरती घेऊन जाणाऱ्या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होते. काम करत असताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते बाराव्या मजल्यावरून खाली पडले. त्यामध्ये गंभीर जखम होऊन तायप्पा यांचा मृत्यू झाला. सुपरवायझर मनोज पवार यांनी बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक साहित्य न पुरविल्याने ही घटना घडली,असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.के. गिरीगोसावी करीत आहेत.