मार्केट यार्डातील तरकारी विभागात गुरुवारी (ता. ७) मागील वर्षीच्या तुलनेत रताळ्यांची दुपटीहून अधिक आवक झाली. घाऊक बाजारात राज्यातील गावरान रताळ्यांना किलोला दर्जानुसार ३५ ते ३८ रुपये, तर करमाळा भागातून आलेल्या रताळ्यांना दर्जानुसार १४ ते १८ रुपये भाव मिळत आहे. तसेच किरकोळ बाजारात ४० ते ७० रुपये किलोला भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कराड, मलकापूर भागातून गावरान रताळ्यांची मागील वर्षी एक हजार पोती आवक झाली होती. यंदा दोन ते तीन हजार पोती आवक झाली आहे. दरम्यान यंदा कर्नाटक येथून रताळ्यांची आवक झालीच नाही. स्थानिक भागातच चांगला भाव मिळत असल्याने ही स्थिती असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.
गावरानची आवक कमी
मागील काही वर्षांचा विचार केल्यास गावरान रताळ्यांची आवक कमी होत चालली आहे. गावरान रताळी चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळ्यांना जास्त मागणी असते.
मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गावरान रताळ्यांची आवक वाढली आहे. तर पूर्वी बीड जिल्ह्यातून आवक व्हायची. मात्र, येथील बाजारापेक्षा मुंबईला जास्त भाव मिळतो. त्यामुळे तेथून आणि कराड भागातून माल मुंबईला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
नवीन प्रजाती विकसित
करमाळा भागातून येथील बाजारात मोठ्या प्रमाणात गावरान रताळ्यांची आवक व्हायची. मात्र, यंदा तेथे नवीन जात विकसित केली आहे. बेळगाव रताळ्यांच्या धर्तीवर ही जात विकसित केली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले आहे. बाजारात त्या भागातून तब्बल चार ते पाच हजार पोती आवक झाली आहे. ही रताळी रंगाने पांढरे असून, बारीक साल आहे. त्याला घाऊक बाजारात किलोस १४ ते १८ रुपये भाव मिळाला आहे.
मार्केट यार्डात मागील वर्षीच्या तुलनेत रताळ्यांची दुप्पट आवक झाली आहे. आवक वाढली असली तरीही गावरानला मागणी जास्त आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मागील वर्षीपेक्षा भाव जास्त मिळाला आहे.