पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०३ : न्यूजक्लिकशी संबंध असणाऱ्या पत्रकारांच्या घरावर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. एकाच वेळी 30 वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. चिनी कंपन्यांकडून आर्थिक मदत घेत देशविघातक कृत्य करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेशी संबंधित सर्व पत्रकारांची चौकशी केली आहे. अनेक पत्रकारांचे मोबाईल – लॅपटॉप जप्त करण्यात आले असून पत्रकार अभिसार शर्मा, उर्मिलेश आणि सत्यम तिवारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात न्यूज पेपर चे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्या घरावर इडीने जप्ती आणली होती.याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी या कारवाईला पुन्हा सुरुवात केली असून अनेक पत्रकारांच्या घरी छापा टाकण्यात आला आहे.
बातम्या देण्यासाठी न्यूजक्लिक या वेबसाईटला चीन देशाकडून अर्थसहाय्य मिळत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पत्रकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया
“न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकार आणि लेखकांच्या घरांवर टाकलेले छापे अत्यंत चिंताजनक आहेत. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही पत्रकारांच्या पाठीशी उभे असून याबाबत अधिक माहिती द्यावी अशी मागणी आम्ही सरकारकडे करतोय.”
– प्रेस क्लब ऑफ इंडिया












