पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : बाप – लेकाने नागरिकांना पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने लाखोंच्या गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी उदय त्र्यंबक जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश त्र्यंबक जोशी यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी गॅस एजन्सी मध्ये रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे.तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोट्या एफडी सर्टिफिकेट्स अनेकांना दिल्या आहेत.
आरोपींनी आतापर्यंत फसवणूक केलेल्यांपैकी नऊ जणांनी तक्रार दाखल केली आहे. त्या नऊ जणांची एकूण पाच कोटी त्रेपन्न लाख आठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
आरोपींविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम ४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितरक्षण अधिनियम १९९९ कायदा कलम ३ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
तसेच आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झाली असेल त्यांनी सर्व कागदपत्रांसह श्री गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर, मो. नं. ७३५००८७२६६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.












