बारामतीमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही काही काळासाठी बंद झाल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी उघडकीस आणला होता. आता असाच गंभीर प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. येथे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम परिसरात एक अनोळखी व्यक्ती शिरल्याचा व्हिडिओ महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात एक अनोळखी व्यक्ती आढळून आला असून हा व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निलेश लंके यांच्या समर्थकांनी केला आहे.
ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाबाहेर लंके यांचे कार्यकर्ते सध्या लक्ष ठेऊन आहेत. त्यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला विचारपूस केली असता, त्याने आपण तांत्रिक विभागातील असल्याचे सांगितले.
मात्र, गोदामाच्या बाहेरील केंद्रीय सुरक्षा विभाग, राज्य सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी? असा सवाल लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
संबंधित व्यक्ती रात्री ८ वाजून २० मिनिटांनी त्या परिसरात आला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. यामुळे ईव्हीएम ठेवलेल्या गोदामच्या सुरक्षेबाबत लंके समर्थकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मविआ उमेदवार निलेश लंके यांनी स्वतः हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे.