बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पातील प्रवेशद्वाराची कमान कोसळून सात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामप्रवेश राध्येश्याम राय या ठेकेदारावर लोणीकंद पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी रामप्रवेश राय याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी जामीन मंजूर केला आहे.
अर्णव मिथिलेश राय (वय ७, सध्या रा. गुलमोहर सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील मिथिलेश रामबच्चन राय यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी साडेचार वाजता घडला होता.आरोपीने ॲड. तनवीर जहागीरदार यांच्या मार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना ॲड. जहागीरदार यांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात दिवाणी व फौजदारीचा वाद आहे. त्यामुळे आरोपीला या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. आरोपीने यापूर्वी कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच गुन्हा केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करुन सुटका करावी असा युक्तीवाद केला. याला सरकारी पक्षाकडून विरोध करण्यात आला.
न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपी रामप्रवेश राय याचा जामीन मंजुर केला.या प्रकरणात ॲड. तनवीर जहागीरदार यांना ॲड. ताहिर खान, ॲड. इम्रान शेख, ॲड. रईस खान यांनी मदत केली.