पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१८ : मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील केशवनगर भागामध्ये राहणारी दोन मुले घरासमोर खेळत असताना रस्ता चुकून कोठेतरी भटकली होती. ती मुले पोलिसांच्या तत्परतेमुळे आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की चैताली संदीप मोरे (वय ३०) व सुधीर महादेव शिंदे (वय ३२) रा. जनसेवा बँकेजवळ पोटे हॉस्पिटल केशवनगर यांची अनुक्रमे दोन लहान मुले ही राहत्या घरासमोर खेळत असताना रस्ता चुकून कुठेतरी भरकटली होती. मुले घरी न आल्यामुळे घाबरलेल्या पालकांनी केशवनगर पोलीस चौकी येथे तक्रार देण्यास आले. पोलीस चौकी अधिकारी धनंजय गाडे, पोलीस उपनिरीक्षक यांनी प्रथम त्यांना आधार देऊन त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक चौकशी केली व घटनेचे गंभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी सदर घटनेची माहिती दिली. घटनेची दखल घेऊन ताम्हणे यांनी मुलांचे फोटो पोलीस ठाणे तसेच नागरिकांच्या ग्रुप वर शेअर करून पोलिसांना शोध घेण्याचा आदेश दिला.
शिवाजी चौक, पवार वस्ती, कुंभारवाडा, नदीपात्र भाग व इतर भागामध्ये बालकांचा शोध घेण्यात आला. तब्बल एक ते दीड तासानंतर हि मुले कुंभारवाडा नदीपात्र भाग परिसरात अस्वस्थ स्थितीत घाबरून भटकत असताना आढळली. मुलांना पोलीस अंमलदार सचिन बोराडे, प्रवीण कोकणे यांनी ताब्यात घेऊन केशवनगर पोलीस चौकीत आणले. दोन्ही मुलांना पालकाच्या ताब्यात दिले. पालकांनी पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल निशब्द होऊन आनंद व्यक्त केला व पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सदरची कामगिरी मा पोलीस उपायुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, मा. सहा पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे यांचे सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे, पोलीस अमलदार सचिन बोराटे, प्रवीण कोकणे, निलेश पालवे यांनी केली आहे.
बेपत्ता मुले पोलिसांच्या प्रसंग अवधानामुळे सुखरूप आई वडिलांना सुपूर्त












