भर रस्त्यात तरुणीची छेड काढून तरुणीच्या आईला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
आईसोबत जाणाऱ्या तरुणीला दगड मारुन तिची छेड काढली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीसोबत वाद घालून आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन धमकी दिली. हा प्रकार सोमवारी (दि.२५) दुपारी दीडच्या सुमारास कात्रज परिसरातील महादेव मंदिराजवळ घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन टवाळखोरांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.२७) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश उर्फ चिराग सचिन बडगुजर (वय-२२ रा. भारतनगर, कात्रज), जया सचिन बडगुजर (वय-४५), मॅडी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर भा.दं.वि. कलम 354, ३५४ ड), ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी तरुणी कामानिमित्त तिच्या आईसोबत जात होती.
महादेव मंदिराजवळ आरोपींनी तिला खडा मारुन तिची छेड काढली. याचा जाब विचारला असता आरोपींनी तरुणीसोबत वाद घातला. तसेच फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन दगडाने मारण्याची धमकी दिली. आरोपी मागील सात ते आठ महिन्यापासून तरुणीला जाता येता शिट्टी वाजवून तसेच अश्लील कंमेंट करुन त्रास देत आहे. तसेच सतत पाठलाग करुन मोबाईल नंबरची मागणी करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत.