पिंपळे गुरव: आपल्या मित्राला मारहाण होताना पाहून त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या तरुण रिक्षाचालकाला टोळक्याने आमच्या भांडणामध्ये पडतोस मी त्याला मारणार होतो, आता तुलाच मारून टाकतो, असे म्हणून कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत व्हेलारे जेकब अॅन्थनी (वय २५, रा. संजय पार्क, विश्रांतवाडी) यांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी विघ्नेश गुणशिलन रंगम (वय २५) याला अटक केली आहे. त्याचप्रमाणे विघ्नेश याचे साथीदार आखिल ऊर्फ भोल्या आणि चिराग घागड यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील मोरया पार्कमध्ये २९ सप्टेबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्हेलारे व त्यांचा मित्र सोहेल मुलाणी हे रिक्षातून जात असताना, सोहेल याच्यासोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी सोहेल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेले. तेव्हा त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन आमच्या भांंडणामध्ये पडतोस मी त्याला मारणार होतो, आता तुलाच संपवितो, असे बोलून विघ्नेश रंगम याने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीवर वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा पुढील तपस संघवी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भिमसेन शिखरे करीत आहेत.