पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : नवरा बायकोच्या भांडणात मध्ये पडल्याने जावयाने सासऱ्यांचा चावा घेत त्यांना जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शिवाजी लक्ष्मण कुचेकर ( वय ५२, रा. वेताळनगर, चिंचवड ) यांनी त्यांचे जावई आदेश प्रकाश कूचेकर ( वय २६, रा. वेताळनगर, चिंचवड ) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या मुलीच्या घरी झोपले होते. त्यावेळी आरोपी हा फिर्यादी यांच्या मुलीस विनाकारण मारहाण करत होता.फिर्यादी हे मुलीला वाचवण्यासाठी मध्ये पडले असता आरोपीने त्यांच्या डाव्या कानावर हाताने मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या डाव्या गालाचा आणि पाठीचा जोरदार चावा घेतला आहे.
आरोपीवर भादवी कलम ३२३,३२५,५०४,५०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस फौजदार सनदी हे करत आहेत.












