बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर पलटवार करत शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोप केला आहे. बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचे नेते एकवटले आहेत. आम्ही मात्र सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे या हिंजवडीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवायचं हे भाजप नेत्यांच्या तोंडून महाराष्ट्रासह अवघ्या देशांने ऐकलं आहे. बारामतीमध्ये येऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना संपवायचं, अशी भाषा वापरली, हे भाजपच्या पोटातील ओठावर आले आहे. हे भाजप नेत्यांचे आणि चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया पुढे म्हणाल्या, भाजपचे केवळ एकच स्वप्न आहे, ते म्हणजे शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवणे. भाजप पक्षाला वैचारिक विरोधक संपवायचा आहे. त्यामुळे ते लोकशाहीकडून दडपशाहीकडे हा देश घेऊन जात आहेत. आम्ही सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.