पुणे: पुण्यातील वडगाव शेरी येथील भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे (वय ४१) यांचे बुधवारी (दि.३) रात्री पावणे बारा वाजता निधन झाले. वडगाव शेरी येथून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या.
एक महिन्यापूर्वी अंगणातील पालापाचोळा वर सॅनिटायझर टाकून पेटवताना भडका झाल्याने त्या भाजल्या होत्या. त्यामुळे पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती ढासळली व काल त्यांची प्राणज्योत मालवली.
शितल शिंदे यांच्यावर आज (गुरुवार) वडगाव शेरी येथील भक्तिसागर स्मशानभुमी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसह परिसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहून त्यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.