पुणे प्रतिनिधी
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. त्यातच सुप्रिया सुळे आणि अंकिता पाटील यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये निवडणुकांना घेऊन कुजबुज सुरू झाल्याचे चित्र आहे. तसेच आगामी बारामती मतदारसंघातील लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याचे बोलले जात आहे.
सुप्रिया सुळे आणि अंकिता पाटील यांच्या मतदारसंघातील दौऱ्याने लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सुधीर पाटसकर यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. पाटसकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रविवारी पाटसकर यांच्या गेल्या घरी होत्या. या वेळी भाजपच्या अंकिता पाटीलही पाटसकरांच्या भेटीसाठी तेथे आल्या होत्या.
दोघीही काही वेळ समोरासमोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एकमेकींना स्मितहास्य करून पुढील दौऱ्यास निघून गेल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी इंदापूर तालुक्यामध्ये सायंकाळी गणपतीच्या आरतीला सुरुवात केली. इंदापूर शहरातील २२ पेक्षा अधिक गणपतीच्या मंडळाला भेटी दिल्या. तसेच भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरेंनीही बावधनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह गणपतीची आरती केली.
यानंतर अंकिता पाटील यांनीही खडकवासला मतदारसंघातील सुमारे दहा गणेश मंडळांना भेटी दिल्या. यासह बारामतीतील डोर्लेवाडी व माळेगाव येथीलही गणेश मंडळांशी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस व अंकिता पाटील यांच्या हजेरीमुळे बारामती लोकसभेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे गणपती बाप्पा राष्ट्रवादीला की भाजपला पावणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.












