पिंपरी- भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस.. त्यांचे नाव पहिल्या यादीत नाही. परंतु, मुंबईतील एक माणूस ज्याच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे, बेहिशेबी मालमत्ता साठवून ठेवल्याचे आरोप केले होते. त्या कृपाशंकर सिंहचे नाव पहिल्या यादीत आहे. परंतु, नितीन गडकरींसारख्या निष्ठावान भाजपा कार्यकर्त्याचे नाव या यादीत नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? ही भाजपाची जाहिरात होती ना… आता त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय? असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले.
काल रात्री मुंबईतील धारावी येथे शिवसेना ठाकरे गटाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, साधी गोष्ट सांगतो भाजपाने १९५ लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कुणाची नावे आहेत? मोदी-शाह यांची नावे आहेत. पण, आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी नावे माहिती नव्हती. भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करुन दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर नितीन गडकरी आले. युतीच्या काळात त्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले. पण त्यांचे भाजपाच्या पहिल्या यादीत नाव नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, मागच्या वेळी युतीचे ४२ खासदार निवडून आले नसते तर दिल्लीचे तख्त राहिले नसते. ते म्हणतात अब की बार ४०० पार, पण मी म्हणतो अब की बार भाजपा तडीपार. आगामी निवडणुकीत आपल्याला यांना तडीपार करायचे आहे आणि दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवायचा आहे, असे ठाकरे म्हणाले.