पुणे | प्रतिनिधी
भोर : तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण बुधवारी (ता. २०) रात्री ११ – वाजण्याच्या सुमारास १०० भरले. पाटबंधारे विभागाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजता धरणावरील वीजनिर्मिती केंद्र सुरु करून त्यामधून १ हजार २६५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला.
बुधवारी सकाळी धरणात ९८.८२ टक्के पाणीसाठा होता. परंतु धरण पट्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. रात्री ११ वाजता धरणात १०० टक्के म्हणजे २३.७४ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे साडेअकरा वाजता धरणावरील वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यात आले.
गेल्या वर्षी भाटघर धरण १२ ऑगष्टला भरले होते. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरण ३८ दिवस उशीराने २० सप्टेंबरला भरले. वीजनिर्मिती केंद्र सुरु केल्यामुळे धरणाचे ४५ स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले नाहीत. परंतु जर पावसाचे प्रमाण वाढले आणि धरणात येणा-या पाणीसाठ्यात वाढ झाली तर स्वयंचलीत दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे पाटबंधारे विभागाने निरा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीच्या पात्रात कोणत्याही विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार याना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.
तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. सर्वानी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी केले.तालुक्यातील ११.९१ टीएमसी क्षमता असलेले दुसरे नीरा-देवघर धरण १९ ऑगष्टला शंभर टक्के भरलेले आहे.












