पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीए यांनी मनापासून इच्छा शक्ती दाखवली आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडणे शक्य झाले आहे. यामुळे महिलांना देशाच्या विकासात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. हे विधेयक महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून या विधेयकाचे स्वागत करत असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाली. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केलं.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, हिंसा, पैशाचा वापर आणि चारित्र्यहनन यामुळे स्त्रियांचा राजकारणातला सहभाग अपुरा राहिला आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण जरी असले तरी लोकसभा विधानसभा यामध्ये महिलांच्या सहभागाचे प्रमाण दहा ते पंधरा टक्केच राहिले आहे. जे राजकीय पक्ष म्हणतात महिलांना राजकारणात संधी द्यायला पाहिजे, त्यांच्या कार्यकारणीमध्ये, नेतेपदी एका देखील महिलेचा सहभाग नाही. या आरक्षणामुळे आगामी काळात महिलांचा राजकारणातील सहभाग वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.












