पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१६ :
पाकिस्तान संघाला चारीमुंड्या चीत करून रविवारी पुण्यात दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी साडेचारच्या सुमारास भारतीय क्रिकेटपटूंचे आगमन होताच चाहत्यांनी ‘इंडिया’ ‘इंडिया’चा जयघोष केला. क्रिकेटपटूंनी चाहत्यांना हात दाखवत अभिवादन केले.
पुण्यात क्रिकेट विश्वचषकातील पाच सामने होणार आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश सामना पुण्यातील गहुंजे मैदानावर गुरुवारी (१९ ऑक्टोबर) होणार आहे. त्यासाठी शनिवारीच बांगलादेशचा संघ पुणे विमानतळावर दाखल झाला. तर रविवारी दुपारी भारतीय संघ दाखल झाला. भारतीय संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासून क्रिकेट चाहत्यांनी टर्मिनलच्या ‘निर्गमन’ द्वारजवळ गर्दी केली होती. खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी मोठ्या बसची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी शहर पोलिस व ‘सीआयएसएफ’च्या जवानांचा तगडा बंदोबस्त होता.
यंदा भारतात क्रिकेट विश्वचषक होत आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह साहजिकच शिगेला पोचला आहे. त्यातच शनिवारी भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघावर दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. विराटला पाहण्याची संधी हुकली विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते ताटकळत थांबले होते.
एका पाठोपाठ एक खेळाडू टर्मिनलमधून बाहेर पडले आणि बसमध्ये जाऊन बसले. मात्र, विराट कोहली व रोहित शर्मा हे विमानतळाच्या बाहेर आलेच नाही. ते दोघेही पुणे विमानतळावरूनच मुंबईला जाणाऱ्या विमानात बसले. त्यामुळे चाहत्यांना विराट कोहली व रोहित शर्मा यांना पाहण्याची संधी हुकली. विमान आधी आले, त्यामुळे ‘गो अराऊंड अहमदाबाद- पुणे या विमानात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू होते.
हे विमान चार वाजून ३० मिनिटांनी पुणे विमानतळावर येणे अपेक्षित होते. मात्र, चार वाजून १५ मिनिटांनी म्हणजे नियोजित वेळेच्या सुमारे १५ मिनिटे आधीच हे विमान पुणे विमानतळावर उतरू पाहत होते. त्यावेळी अन्य विमाने उतरत होती. तसेच एरोब्रिजवर देखील प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे ‘एटीसी’नी संबंधित विमानास ‘गो अराऊंड (विमानतळाभोवती चक्कर) करण्यास सांगितले. चार वाजून २५ मिनिटांनी विमान पुण्याच्या धावपट्टीवर उतरले.












