पुणे : पुणे भारत गायन समाज येथे अनेक दिग्गज, बुजुर्ग कलाकारांच्या स्मृती त्यांच्या छायाचित्रांच्या रूपाने जपण्यात आल्या आहेत. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांच्या स्मृतीही जुन्या वास्तूत जपल्या जाव्यात या उद्देशाने प्रभाताई अत्रे यांचे छायाचित्र त्यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांनी संस्थेच्या मानद अध्यक्ष शैलाताई दातार यांच्याकडे सुपुर्द केले.
देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांच्या 102व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी आयोजित सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सांगीतिक मैफलीचे निमित्त साधून आरती कुंडलकर यांनी स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांचे छायाचित्र संस्थेस भेट दिले. प्रभाताई यांच्या सहाय्यक डॉ. भारती दिदी यावेळी उपस्थित होत्या. सांगीतिक मैफलीत शैलाताई दातार, पंडित सुहास व्यास, आरती ठाकूर-कुंडलकर यांचे गायन झाले तर ऋजुता सोमण यांची कथक नृत्य प्रस्तुती झाली.
भावना व्यक्त करताना आरती ठाकूर-कुंडलकर म्हणाल्या, जवळजवळ 23 वर्षे मी ताईंकडे संगीत साधना केली. शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत असणे म्हणजे काय हे प्रभाताईंचा सहवास मिळाल्यामुळे अनुभवायला मिळाले. प्रभाताई सुरात रमणाऱ्या कलाकार होत्या. संगीत साधना करीत असताना संवेदनशील कलाकार, संवेदनशील व्यक्ती प्रभाताईंच्या रूपाने पहायला मिळाल्या. संगीत क्षेत्रात आगामी काळात वाटचाल करीत असनाता त्यांचे आशीर्वाद लाभावे हीच प्रार्थना आहे.