भीमा कोरेगाव ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, साजरा होत असून याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून (००.०० वा.) ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आले आहेत.
आदेशानुसार या कालावधीत कोणाही व्यक्तीला इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर (सध्याचे एक्स), फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही, असे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे केल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची राहील. पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.वि.सं. कलम १८८ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.