भाजपा पहिल्या दोन टप्प्यांत मागे पडल्याचे आकडे समोर आल्यानंतर हे नवीन आकडे जाहीर करण्यात आले. हे आकडे आले कुठून? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर खळबळजनक आरोप केले आहेत. राऊत यांनी म्हटले आहे की निवडणूक आयोगाने ६ ते ७ टक्के मते अचानक वाढल्याचे दाखवले आहे. सोशल मीडियावर देखील या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.
संजय राऊत यांनी म्हटले की, ६ ते ७ टक्के मते अचानक वाढल्याचे दाखवले आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर ११ दिवसांनी त्यांनी आकडे दिले. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर तीन दिवसांनी हे आकडे आले. त्या सर्व मतदारसंघांमध्ये अचानक मतदानात ६ ते ७ टक्के वाढ झाल्याचे आयोगाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
राऊत यांनी म्हटले की, नांदेडला मतदान संपले तेव्हा ५२ टक्के मतदान झाले होते. त्यात अर्धा ते एक टक्का फरक दुसऱ्या दिवशी मतदान संपल्यानंतर होतो. पण १० टक्के फरक कसा होऊ शकतो? देशभरात ज्या मतदारसंघांत मतदान झाले, तिथे असे आकडे आयोगाने जाहीर केले. ते अत्यंत धक्कादायक आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे की, तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर होण्यासाठी ११ दिवस लागलात? आत्तापर्यंत हे आकडे संध्याकाळी कळत होते. आश्चर्य असे की फक्त नागपूर मतदारसंघात त्यांनी अर्धा टक्का मतदान कमी दाखवले आहे. इतर सर्व मतदारसंघांत हे प्रमाण वाढले आहे, असे राऊत यांनी म्हटले.
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोग भारताचा राहिला नसून तो मोदी-शाह या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातले बाहुले झाला आहे का? पाकिस्तानात निवडणुका लष्कराच्या हातात असतात, तसेच आपल्याकडे निवडणूक आयोगाने केलेले घोळ हेच दाखवत आहेत की कुणीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला हाताळत आहे.
भाजपा पहिल्या दोन टप्प्यांत मागे पडल्याचे आकडे समोर आल्यानंतर हे नवीन आकडे जाहीर करण्यात आले. हे आकडे आले कुठून? असा सवाल राऊत यांनी केला आहे.