पुणे : एका धक्कादायक घटनेत पुण्यातील ७६ बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. डॉ राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे यांनी सामायिक केलेल्या माहितीनुसार, मतदार नोंदणीच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या ७६ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली. त्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघात अत्यल्प मतदार नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे खडकवासला मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी बीएलओ म्हणून नेमण्यात आलेले शिक्षक या कामाकडे गंभीर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची कडक दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत महापालिका शाळांमध्ये बीएलओ म्हणून नियुक्त केलेल्या सर्व संबंधित शिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर संबंधित बीएलओंनी त्यांच्या कामात लक्ष घालून मतदार नोंदणीचे काम गांभीर्याने व कोणतीही अडचण न येता करणे अपेक्षित आहे. या कामात संबंधित बीएलओंनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचे सिद्ध झाल्यास लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मतदार नोंदणीच्या कामात अनियमितता करणाऱ्या ७६ बूथ लेव्हल अधिकाऱ्यांवर कारवाई












