पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : पुणे शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी आणि नागरिकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी शिवाजी नगर मेट्रो स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर मेट्रो स्थानक आणि मंडई स्थानकाचे नामांतर महात्मा फुले मेट्रो स्थानक करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र सादर करून त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. “पुणे हे महाराष्ट्राचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते म्हणून दोन दोन स्थानकांचे नाव बदलण्याची मागणी मनसे शहर युनिटने केली आहे.”
तत्पूर्वी, पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते बाबू वागस्कर यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मेट्रोच्या घोले रोड कार्यालयात आपली मागणी रेटून धरली होती. पालिका प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात पक्षाने म्हटले आहे: “दोन व्यक्तींच्या नावावर स्थानकांची नावे देण्याचा उद्देश शहराचा इतिहास आणि वारसा जतन करणे आणि पुणेकरांच्या भावनांचा आदर करणे आहे.”
“छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले हे महान व्यक्तिमत्त्व तर आहेतच, शिवाय ते महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा आणि अभिमानाचा विषय आहेत. मेट्रो स्थानकांना शिवाजी नगर आणि मंडई असे नाव देणे हे दोन्ही व्यक्तिमत्त्वांसाठी अत्यंत अपमानास्पद आहे,” बाबर यांनी सांगितले आहे.












