मनोज जरांगे जी स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, ती नेमकी कुणाची आहे? कारण आम्हाला या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास यायला लागला आहे. हा लढा मराठा समाजाचा असेल तर तो लढा मराठा समाजापर्यंत मर्यादीत ठेवावा. जर त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप करण्याचं राजकारण केलं आणि खालच्या पातळीवर येऊन टीका केली. तर सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे
मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपाकडूनही त्यांच्यावर पलटवार करण्यात येत आहे. नितेश राणे वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. त्यामुळेच मराठा समाजानेही फडणवीस यांना स्वीकारलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होत नसेल आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतील तर आम्हीही मराठेच आहोत. त्यांना तोंड देण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत.