पुणे प्रतिनिधी
पुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर दौऱ्यावर आहेत. यावेळी मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम २४ तारखेला संपत आहे. यानंतर देखील जर आरक्षणाबद्दल निर्णय घेतला गेला नाही तर, पुन्हा मराठा समाजाकडून आंदोलन केलं जाणार आहे.
यादरम्यान आज जुन्नर येथे आयोजित सभेमध्ये बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा लढा २९ ऑगस्टपासून सुरू आहे. काल आपल्या एका बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली. आपल्या परिवारातील सदस्य गेला म्हणून मी फुलं टाकू नका असं सांगितलं. आज आपल्याला हार-फुलं काही घ्यायचे नाहीत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे त्याचं स्वप्न होतं, यासाठी काल त्याने आत्महत्या केली, ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. मराठा समाजाच्या पोरांचे मुडदे पडायला लागले, पोरं आत्महत्या करायला लागले याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
सरकारला जाहीर पणाने सांगतो की आत्महत्या होत आहेत त्याला तुम्ही जबाबदार आहेत. मराठा आरक्षणाचा तुम्ही गांभिर्याने घ्या. आम्ही एकही बलीदान आत्महत्या वाया जाऊ देणार नाही. आत्महत्या केली त्या बांधवाच्या पाठीशी सगळा मराठा समाज उभा आहे असेही जरांगे यावेळी म्हणाले.
सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तात्काळ सुरूवात करावी. अन्यथा २४ तारखेच्या नंतर शांततेत होणारे आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. हे मी शिवनेरी गडावरून सरकारला जाहीरपणे सांगतो असेही जरांगे यावेळी म्हणाले.
कारण आमचा संयम सुटला नाही पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला चार दिवसांचा वेळ दिला होता. तुम्ही कायदा पारित करण्यासाठी एक महिन्याचा वेळ घेतला, आम्ही दहा दिवस वेळ वाढवून दिला. आता जर तुम्ही चालढकल करण्याचा प्रयत्न केला तर हा लढा सामान्य व्यक्तींनी हातात घेतला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही असेही जरांगे यावेळी म्हणाले.












