राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे.त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांकडून बंद पाळण्यात आला. नगरमधील कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
नगरमध्ये मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून माणिक चौक, कापड बाजार, दिल्ली गेट अशी पायी रॅली काढत नगरवासीयांना बंदचे आवाहन केले. नगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निघोज व परिसरातील व्यवसायिक, दुकानदार यांनी 100 टक्के दुकाने बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा दिला आहे. बंदमध्ये पारनेर शहरासह तालुक्यातील जनतेने, व्यापाऱयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जामखेड तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला जामखेडवासीयांनी पाठिंबा देत 100 टक्के बंद पाळला.
मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस वाढवून देण्याची विनंती मागासवर्ग आयोगाने केली आहे.