पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घरी ट्रेडमिलवर चालतेवेळी कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. योग्य ते उपचार आणि तपासण्या केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
डोक्याला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे. पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मणिमॉय बंदोपाध्याय यांनी यासंदर्भात माहिती दिली. घरी पाय घसरून पडल्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके घालून उपचार केले. तसेच, त्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत.
रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना मागून धक्का लागल्यामुळे त्या पाय घसरुन पडल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर तीन टाके घातले आणि एक टाका नाकाला झालेल्या दुखापतीला घातला आहे.