पिंपरी – ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे यांची आहे. तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांचा आरक्षणाचा वाद सुटणार का ? ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींच्या आरक्षणावर काय परिणाम होईल ? अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण राज्यात ओबीसीला 19% आरक्षण मिळतंय. 374 जातींना हे आरक्षण मिळत आहे. महाराष्ट्रात ओबीसींची लोकसंख्या 38 टक्के आहे. तर मराठा समाज 33 टक्के आहे. अशावेळी ओबीसींमध्ये मराठा समाज आला तर आरक्षणाचा मोठा वाटा मराठा समाजाकडे जाईल. त्यामुळे ओबीसींच्या वाट्याला कमी आरक्षण येईल. ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज ओबीसी आरक्षणात आल्यावर दोन्ही समाजात आरक्षण विभागलं जाईल. पण आरक्षणाची टक्केवारी जी 19 टक्के आहे, ती कायमच राहील. यामुळे या दोन्ही गटात वाद सुरु होता.
आणि आता ब्राम्हण आणि मराठा वाद उफाळून येण्याची दाट शक्यता, कारण काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय. मला संपविण्याचा डाव आहे. सलाईनमधून माझ्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा बामणी कावा आता चालणार नाही. जरांगे पाटील यांच्या आरोपांवरून महाराष्ट्रात पुन्हा तणाव निर्माण झालाय. देवेंद्र फडणवीस यांचा बामणी म्हणून उल्लेख केल्यामुळे पुण्यातील हिंदू महासभाही आक्रमक झालीय. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी जरांगे विकृत होत चालले आहेत अशी टीका केलीय. शेवटी! देवेंद्र यांची जात आठवलीच ना मनोज जी असा टोलाही त्यांनी लगावला. फसवं का असेना? पण, मराठा समाजाला पहिलं आरक्षण त्यांनीच दिले. याच ब्राह्मण उपमुख्यमंत्री असलेल्या सरकारकडे तुम्ही मागण्या करत होतात आणि करत आहात. आज तुम्ही बदलले. मुस्लिम आरक्षणाची मागणी करताना तुम्हाला ब्राह्मण मात्र नकोय. असंही ते म्हणाले.
जरांगेनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी देखील मागितली. पण पुढे हा विषय इतका गंभीर झाला कि याचे पडसाद संसदेत उमटले. त्यानंतर भाजप नेत्यांनी मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली. भाजप नेत्यांची हि मागणी मान्य करून मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतरच मराठा समाजानी ब्राह्मण समाजाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर ब्राह्मण समाजाने देखील मराठ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद पेट घेत असतांना मराठा समाजातील एका युवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यात तो म्हणतोय आम्ही मराठा समाजाने ठरवलं तर ३ मिनिटांत ब्राम्हण समाजाला संपवू. आणि
त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली होती. या परिषदेत बोलताना अभिनेत्री केतकी चितळे हिने मराठा समाजाबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य केलं आणि ते तिला भारी महागात पडलंय. केतकी चितळे हिने मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलकांना येड्याची जत्रा म्हणून संबोधलं होतं. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. परळी येथील आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. केतकी चितळे च्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजातील अनेक लोकांनी तिला कमेंटद्वारे शिवीगाळ केली. वेगवेगळ्या स्तरातून तिच्यावर टीका केली. यावेळी तिच्या विरोधात बोलताना आणि मराठा समाजाच्या बाजूने बोलताना ओबीसी समाज दिसला. या घटनेनंतर ब्राम्हण आणि मराठा वाद उफाळून येण्याची दाट शक्यता तर आहेच पण या वादामुळे आता मराठा समाज आणि ओबीसी समाज एकत्र येईल अशी चिन्हे दिसत आहेत. या सर्व प्रकरणात ओबीसी समाज आज मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहतांना दिसतोय.