मुंबई : मराठा आंदोलन हे गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांचा हा लढा अद्यापही सुरू असला तरी २६ जानेवारीला त्यांच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला. मात्र त्यानंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली होती. यासाठी त्यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केला आहे. याचपार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे येत्या २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सगेसोयऱ्यांचा कायदा करावा, राजपत्र काढवे, मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी नाही त्यांनाही सगेसोयऱ्यांच्या कायद्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण द्यावे, दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे, अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीसह राज्यात दाखल गुन्हे मागे घेतले जावे, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि सातारा गॅजेट यांची नोंद घेऊन ते स्वीकारावे आणि ओबीसी प्रमाणपत्र द्यावे,
तसेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा करावा, अशा अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मात्र आज मराठा समाजाच्या विनंतीनंतर त्यांनी सलाइन लावून उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.