मुंबई : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, पण मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी खदखद बोलून दाखवली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. आपली पुढील राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करणार आहे. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिला असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
मी काँग्रेसमध्ये जन्मापासून सक्रिय आहे, गेल्या 30 वर्षांपासून मी काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी अनेक प्रयत्न केली आहे. मलाही काँग्रेसने मोठं केलं आहे. यामध्ये शंका नाही पण काँग्रेसलाही मोठं करण्यासाठी अशोक चव्हाण मागे राहिलेले नाहीत, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत