पुणे: आज महायुतीतील घटक पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची महाबैठक पार पडली. चंद्रकांत पाटील यांनी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून महिलांशी संवाद साधताना नावामध्ये वडिलांप्रमाणे आईच्या नावाचा उल्लेख करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आवर्जून उल्लेख केला, तसेच केंद्र सरकार च्या महिलांसाठीच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी ची माहिती देताना हे सर्व आणि विकासाचे मुद्दे हे प्रचाराच्या केंद्रस्थानी असावेत असे सांगितले.
यावेळी महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सर्व भगिनींशी संवाद साधताना “महिलांकडून मोठ्या अपेक्षा असून त्यांनी स्वतंत्रपणे प्रचाराची यंत्रणा राबवावी आणि घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकार ने महिलांसाठी चे घेतलेले निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले.” आम्ही एक परिवार म्हणून काम करत असून महायुतीतील सर्व सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकदिलाने प्रचाराला लागले असून मला पुरेसा अवधी मिळाल्याने विजयाची खात्री वाटते असेही ते म्हणाले.
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी देशभर मोदी लाट असल्याचा उल्लेख करून महिला ह्या मतदारांच्या घरापर्यंत जाऊ शकतात आणि महायुतीच का हे जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतात असे सांगितले.तसेच पुणे महिलांसाठी कसे सुरक्षित करता येईल यासह बचत गटाच्या महिलांचे प्रश्न, घरेलू कामगारांचे प्रश्न, महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न हे आमच्या जाहीरनाम्याचा भाग असू शकतात असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दीपक मानकर महिलांशी संवाद साधताना म्हणाले ” विजय आपलाच आहे पण तो विक्रमी मतांनी व्हावा यासाठी महिलांना विशेष परिश्रम घ्यावे लागतील, महिलांनी किमान दीड लाख मतांनी लीड वाढविण्यासाठीचे नियोजन करावे, नारी शक्ती ने ठरविले तर ते कोणतेही परिवर्तन घडवू शकतात असे आवाहन ही दीपक मानकर यांनी केले.आजची महाबैठक ही मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाची नांदी असल्याचेही ते म्हणाले.
ह्या वेळी भा.ज.पा. चे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नेते अजय भोसले, युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी,आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, महायुतीचे पुणे, शिरूर, बारामती लोकसभा क्लस्टर चे समन्वयक संदीप खर्डेकर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ता सागरे, आर.पी.आयचे मंदार जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रमुखांच्या मार्गदर्शनानंतर भाजपच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, शहर सरचिटणीस वर्षाताई तापकीर,शिवसेनेच्या सुदर्शना त्रिगुणाईत, पूजा रावेतकर,नेहा शिंदे,श्रुती नाझिरकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी भोसले,गौरी जाधव, पूनम पाटील, आरपीआयच्या सुनिताताई वाडेकर, ऍड. अर्चिता जोशी, हिमाली कांबळे, लोकजनशक्ती पक्षाच्या कल्पनाताई जावळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना प्रचाराची दिशा निश्चित केली. हर्षदा फरांदे यांनी उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत दिलेले २० कोटी जोड,जल जीवन मिशन अंतर्गत १० कोटी नवीन घरांना नळजोडणी,तिहेरी तलाक गुन्हा ठरविण्याचा निर्णय ह्या सगळ्याचा अंतर्भाव आमच्या प्रचारात असेल असे सांगितले.
महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी ” मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे महिलांचे
आयुष्य सुकर बनले असून,प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, २८ कोटिहून अधिक महिला जनधन योजने मूळे बँकांशी जोडल्या गेल्याची उपलब्धी, मातृत्व रजेत १२ आठवड्यावरून २६ आठवड्यापर्यंत केलेली वाढ, महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी ची महिला हेल्पलाईन योजना या माध्यमातून महिलांना अधिकाधिक मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर हर्षदा फरांदे, गौरी जाधव, संगीता बराटे, पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत, अर्चिता जोशी यांनी संयोजन केले.